Thursday, June 30, 2011




दलित स्त्रीलेखनाची विद्रोही वाट

  लित आणि स्त्री साहित्यातील विद्रोह असं सूत्र घेऊन मुंबईत या महिन्याच्या सुरुवातीला झालेला परिसंवाद बऱ्याच प्रश्नांना उलगडत पार पडला. निमित्त होतं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टने आयोजित केलेल्या पाचव्या आंतरभारती साहित्य संवादाचं. आंतरभारतीच्या प्रसारासाठी असा कार्यक्रम दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतो. यंदा भारतीय साहित्यातील विद्रोह असंच या दोन दिवसीय कार्यक्रमाचं विषयसूत्र होतं. त्याअंतर्गत झालेला दलित व स्त्री साहित्यविषयक परिसंवाद चांगलाच रंगला. मराठीतील प्रज्ञा पवार आणि तामीळमधील बामा या दोन दलित लेखिकांचा सहभाग त्यात होता. दलित असणं आणि स्त्री असणं यात अधिक वेदनादायक काय आहे, या राजस्थानी व हिंदीतील नामवंत कवी चंद्रप्रकाश देवल यांनी विचारलेल्या प्रश्नावर दोघींनीही दलित स्त्री असणं, असं उत्तर दिलं. तर, एकच उत्तर हवं असल्यास मात्र आपण दलित असणं असंच म्हणू’, अशी बामाची भूमिका होती.

 मराठीपुरतं बोलायचं तर दलित स्त्री लेखनाची त्यातली परंपरा महत्त्वाची ठरते. पुरुष लेखकांनी ज्याप्रमाणे इथल्या जातीय व्यवस्थेला हादरवून सोडणारं लेखन केलं तेच दलित लेखिकांनीही केलं. मुळात एरवीही स्त्री लेखनाचा वेगळा विचार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कारण आज एकविसाव्या शतकातही एकच  सामाजिक आणि राजकीय परिस्थिती स्त्री-पुरुषांवर समान परिणाम करत नाही. स्त्री-पुरुषांची मानसिकता वेगळी बनलेली असते, धारणा वेगळ्या असू शकतात आणि जगाकडे बघण्याची त्यांची दृष्टीही निरनिराळी असू शकते. याला शतकानुशतकांची पुरुषसत्ताक पैतृक समाजाची घडी कारणीभूत ठरते. यासंदर्भात दलित लेखिकांचा विचार करताना भारतीय समाजातील जात आणि स्त्री यांच्यातील विशिष्ट संबंधाची दखल घ्यावी लागते. हिंदुधर्मातली चातुर्वर्ण्यावर आधारित सामाजिक रचनेने स्त्रीवर घातलेली बंधनं आणि जातीच्या उतरंडीमुळे एकूणच असणारी विषमता या गोष्टींनी स्त्रीच्या अस्तित्वाचा संकोच करून टाकला. दलित स्त्री असणं हे या अर्थाने अधिक वेदनामय ठरतं ते यामुळेच. कारण दलित स्त्री ही दलित म्हणून आणि स्त्री म्हणून अशी दुहेरी भेदभावाचा बळी ठरत आली आहे.
  
दलित साहित्य म्हणजे मानवमुक्‍तीच्या पथावरची यात्राच आहे. त्यास वेदना, प्रतिकार, विरोध, बुद्धिप्रामाण्यवाद अशा अनेक जाणीवांचा स्पर्श आहे. दलित स्त्रीचं जीवन हे स्त्रीशोषणाच्या जातिव्यवस्थेत असलेल्या मुळांची आठवण करून देतं. ती अधिक दडपलेलं जगणं जगते. स्त्री म्हणून आणि दलित जातीत जन्मली म्हणून तिला समाजात विशिष्ट वागणूक मिळते. तर पुरुषसत्ताक रचनेत कुटुंबातही तिचं शोषण होतच असतं. दलित लेखिकांची ही अनुभूती त्यांच्या लिखाणातून वेळोवेळी प्रकट झाली आहे. मराठीत असलेली दलित स्त्रियांची आत्मकथनं यादृष्टीने महत्त्वाची ठरतात. बेबी कांबळे, शांताबाई कांबळे, मीनाक्षी मून, ऊर्मिला पवार, कुमुद पावडे अशी अनेक नावं इथे आठवतात. कुमुद पावडे यांच्या अंतःस्फोटमधला, मला अहेव मरण नकोच सारख्या लिखाणातला सूर असो, की ऊर्मिला पवारांच्या आयदानमधून आलेलं घरकामाची निरवानिरव करून मगच रात्री लिहायला बसावं लागणं, अन्यथा नवऱ्याच्या रोषाचं कारण होणं असो; दलित स्त्रीच्या वाट्याला येणारं पुरुषसत्तेचं वास्तवही त्यांच्या दलितपणाइतकंच जाचक ठरताना दिसतं. दलित पुरुषांनी आपल्या आत्मपर लिखाणात आईच्या कष्टांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आढळतो, पत्नीच्या कष्टांचीही दखल त्यात दिसते. पण बाईकडे भोगदासी म्हणून बघण्याची वृत्तीही काहींच्या लेखनात आढळते. दलित स्त्रियांच्या आत्मकथनांमधून व्यक्‍तिगत गोष्टींबरोबरच बदलत्या सामाजिक वास्तवाची दखलही घेतल्याचं जाणवतं. दलित चळवळ, परंपरेला तिने केलेला विरोध यांचे उल्लेख त्यात सापडतात. समाजात येणाऱ्या विदारक अनुभवांबरोबरच दलित स्त्री आपल्या वाट्याला घरात येणारी वागणूक आणि त्यातील अन्यायाबद्दलही लिहिते. एक आत्मभानाची जाणीव तिला स्पर्श करून गेल्याचं जाणवतं. स्त्रीचं आत्मचरित्र म्हणजे तिच्या पतीविषयीच जास्त सांगणारं लेखन ही मराठीतली परंपरा नाकारून दलित स्त्रियांची आत्मकथनं समोर येतात.

 आजच्या महत्त्वाच्या दलित लेखिकांमध्ये प्रज्ञा पवारचा समावेश करावाच लागेल. कवितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या प्रज्ञाने दलितपणाचा अनुभव आणि स्त्रीवादी भूमिका यांची सांगड घालत लिहिलं आहे. अलीकडे लव्ह इन द टाईम ऑफ खैरलांजी किंवा विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर अशा आपल्या दीर्घ काव्यांमधून सामाजिक जाणिवांचे पडसाद आविष्कृत केले आहेत. परवाच्या परिसंवादात प्रज्ञा पवारने, दलित स्त्रियांनी पुरुषी प्रवृत्तीबद्दल लिहू नये, ल्ह्ल्यास पाश्चिमात्य स्त्रीवादाचं अनुकरण त्या करतात असं मानलं जातं अशी एक साथ तक्रार मांडली. व्यक्‍तिगत अवकाशातील सत्तासंघर्षाबाबत जाहीरपणे स्त्री जेव्हा लिहिते, तेव्हा नेहमीच अशी आडकाठी केली जाते आणि दलित स्त्रीही याला अपवाद नाही हेच यावरून स्पष्ट होतं.
  
 बामा या तामीळभाषक लेखिकेची एक बंडखोर लेखिकेचीच प्रतिमा आहे. तिनेही या परिसंवादात असाच सूर लावला की, भारतीय समाजात जातवार रचनेमुळे होणारं शोषण एक तऱ्हेच्या साम्राज्यवादाचंच रूप आहे. शोषक आणि शोषित अशा दोन संस्कृतीच इथे अस्तित्वात आहेत, असं तिचं म्हणणं होतं. बामाबद्दल जाणऊन घेणं इथे नक्कीच प्रस्तुत ठरावं. फाऊस्टिना बामा असं नाव असलेली ही लेखिका बामा या नावाने लिखाण करते. तामीळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातल्या ओनगूर या गावातल्या शाळेत ती शिक्षिका आहे. गेल्या जवळजवळ वीस वर्षांपासून बामा लेखन करते आहे. तिच्या लिखाणाची सुरुवात आत्मकथेने झाली. बामाच्या गावातील विशिष्ट दलित जातीतील सारेजण ख्रिस्ती झाले होते. ती ख्रिश्चन धर्मातील दलित आहे. तिच्या आजोबांच्या काळातच हे धर्मांतर झालं होतं, म्हणजे फार जुनी गोष्ट नाही. धर्म बदलला तरी दलितत्व पुसलं जात नसल्याने आलेले अनुभव बामाच्या मनात घर करून बसले. हे दलितत्व ख्रिश्चन धर्मातील लोकही विसरत नाहीत हा अनुभव तर अधिकच त्रासदायक होता. बामाला जोगीण (नन) व्हायचं होतं, पण रोमन कॅथॉलिक चर्चमधल्या ननच्या प्रशिक्षणाच्या वेळी आलेल्या भेदभावाच्या वागणुकीने तिला हादराच बसला. नन बनायला जाताना तिच्या मनात असलेला तळागाळातल्या लोकांचा विचार तिला तिथे कुठेच दिसला नाही. चर्च आणि कॉन्व्हेंटचे विचार आणि संकल्प काही वेगळेच असल्याचं तिच्या लक्षात आलं. आपला अभ्यासक्रम अर्ध्यावरच सोडून ती गावात परतली. मग धर्मपीठाकडून होणारा जाच, अन्याय आणि शोषण याला वैतागून तिने नन होण्याचा मार्गच सोडून दिला.
 
 सुशिक्षित दलित स्त्रीचं एकटेपण आणि असुरक्षितता अनुभवतानाच आपल्या जातीच्या सुखदुःकांशी बामा जोडल गेली. स्वतःच्या दलितपणाची ही नवी ओळख तिला जगण्यातील मर्म समजावणारी ठरली. तिचा हा प्रवास तिच्या अवतीभवतीच्या ग्रमीण वास्तवासह तिच्या कारुक्कु या आत्कथनात चित्रित झाला आहे. दलित स्त्रीचं तामीळमधील हे पहिलंच आत्मकथन आहे. व्यक्‍तिगत संघर्षातून, अडचणीतून एक दलित स्त्री स्व-ओळखीच्या मार्गावर कशी रुळते याचं प्रत्यंतर देणारं हे लेखन आहे. धर्मशिक्षणाच्या प्रक्रियेतून बाहेर पडून धर्मपीठालाच प्रश्न विचारणारी, स्वतःच्या श्रद्धा तपासून पाहणारी आणि स्वतःची दलित म्हणून असणारी ओळख जवळ करू पाहणारी बामा यात भेटते. तिची चार पुस्तकं प्रकाशित झाली असून चारींचा इंग्रजी अनुवादही झाला आहे. संगती या पुस्तकातून तिने कादंबरीची रचना ठेवली असली तरी सलग असं कथानक त्यात नाही. घटनांची साखळी विणल्याप्रमाणे यातलं निवेदन आहे. संगती शब्दाचा अर्थच घटना असा आहे. या पुस्तकात बामाने आपल्या गावातील दलित समाजाची दिचर्या, स्त्रियांचं जगणं आणि त्यांना मिळणारी हिंसापूर्ण वागणूक अशा गोष्टींचा आलेख मांडते. दलित स्त्रीवर घरात पुरुषाची आणि बाहेरच्या जगात उच्चवर्गाची सत्ता कशी चालते याचं दर्शन या लेखनातून तिने घडवलं आहे. ग्रामीण भागातली लोकसंस्कृतीशी जवळीक साधणारी जीवनरहाटी आणि ज्येष्ठ स्त्रियांच्या भावविश्वातल्या जुन्या वळणाच्या रीतिभाती, चर्चमधील सामूहिक विवाह अशा गोष्टी यात बामाने टिपल्या आहेत. तसंच, दलित स्त्रीची स्वतःच्या शरीराविषयीची जाणीव, लज्जा, आरोग्याविषयीचं भान याबद्दलही बामा लिहिते.   लोकगीतं, लोककथा आणि काव्य याबद्दचं हृद्य लेखनही बामाने यात केलं आहे. याशिवाय वनमान ही कादंबरी आणि किंशुबुकारण हा कथासंग्रह ही तिची पुस्तकं आहेत.
   दलितत्व आणि स्त्रीवाद अशा दोन्ही प्रवाहांच्या जाणिवा आविष्कृत करणारं बामा आणि प्रज्ञा यांच्यासारख्यांचं लेखन सामाजिक-राजकीय परिप्रेक्ष्यातून स्त्रीचा विचार मांडत जाणारं लेखन आहे. जात आणि लिंगभावविषयक जाणिवांतून होणारं दमन-शोषण या लेखिका चित्रित करतात. बामासारखी लेखिका दलित स्त्रीवाद आपल्या लिखाणातून जोरकसपणे आणते. विद्रोहाच्या दलित स्त्री साहित्यातल्या या खुणा डोळस आश्वासकतेचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.
(३० जानेवारी २०११)
   


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home